औरंगाबाद: दारूच्या पैशावरून सुरू झालेल्या वादाने तलवारबाजीचे रूप घेतले आणि बघता-बघता रक्ताचा सडा पडला. ही घटना शहरातील जयभवानीनगर भागात घडली. या हाणामारीत दोन्ही गटातील चार जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत राधाकिशन नवगिरे (वय २५ वर्षे. रा. फुलेनगर), बुद्धभूषण मगन निकाळजे, मधु म्हस्के अशी जखमींची नावे आहेत. गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास जयभवानीनगरमधील निसर्ग नावाच्या बियर बारमध्ये सिद्धार्थ निकाळजे हे काही जणांसोबत गेले होते. त्यावेळी हॉटेलचालक सतीश मारुती हजारे यांच्यासमवेत दारूच्या पैशावरून वाद झाला. नंतर हा वाद विकोपाला गेला. तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडे घेऊन दोन्ही गट एकमेकांना भिडले. या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी अभिजीत नवगिरे आणि बुद्धभूषण निकाळजे या दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सतीश मारुती हजारे, धनराज सखाराम जाधव, अनिल रावसाहेब जाधव, शेखर हजारे यांना पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उस्मानपुर्यात हॉटेल व्यवस्थापकाला भोसकले
जयभवानीनगर भागातील घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने पैशाच्या किरकोळ कारणावरून उस्मानपुरा भागातील रुबी हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या पाठीत चाकूने भोसकले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.